समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांना द्यावी लागणार नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 04:16 PM2021-10-28T16:16:44+5:302021-10-28T16:32:53+5:30
High Court granted relief to Sameer Wankhede :राज्य सरकारने वानखेडेंच्या या याचिकेला विरोध केला. तसेच समीर वानखेडेंविरोधात सध्या चार तक्रारी आल्या आहेत.
एनसीबीचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबईत काही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून करण्यात येणाऱ्या कठोर कारवाईविरोधात दिलासा मिळवण्यासाठी याचिका समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका निकाली काढत उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा देत मुंबई पोलिसांना अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३ दिवसांची नोटीस समीर वानखेडे यांना देण्यास सांगितले आहे.
मुंबई पोलीस अटक करतील अशी या भीतीने समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा दिला आहे. वानखेडे यांनी आपल्या याचिकेत माझ्यावरील आरोपांविषयी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपास पथकाकडून आधीच चौकशी सुरू झाली आहे. मग मुंबई पोलिसांच्या स्वतंत्र विशेष तपास पथकाची आवश्यकता काय? मुंबई पोलीस मला टार्गेट करेल.
राज्य सरकारने वानखेडेंच्या या याचिकेला विरोध केला. तसेच समीर वानखेडेंविरोधात सध्या चार तक्रारी आल्या आहेत. त्याची मुंबई पोलिसांचे वरीष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. तपास सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. तूर्तास कुठेही गुन्हा नोंदवलेला नाही, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.