मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला 'केदारनाथ' या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका आज हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
केदारनाथमधून सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सवर्ण समाजातील हिंदू मुलगी एका गरीब मुस्लिम टुरिस्ट गाईडच्या प्रेमात पडते, असे याचे कथानक आहे. 'केदारनाथ' चित्रपटाविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका राजकीय हेतूने प्रभावित असल्याचे सेन्सॉर बोर्डाने नमूद केले आहे. तसेच 'केदारनाथ' चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गढवाल येथील स्वामी दर्शन भारती यांनी उत्तराखंड हायकोर्टात दाखल केली होती. यावर कोर्टाने भारती यांनी रुद्रप्रयागच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली तक्रार घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, जर या चित्रपटामध्ये २०१३ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ भागात आलेल्या भीषण पुरातील पीडितांविरोधातील आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे चित्रण असेल तर बंदी आणण्यात येईल, असे मुख्य न्या. रमेश रंगनाथन यांनी स्पष्ट होते. या चित्रपटात लव्ह-जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.