मुंबई - लोकांसाठी घर बनवणारा दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यानेच पुण्यातील आपला बंगला व्हिला नंबर १ हा भाड्याने मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ११ लाख रुपये भाड्यापोटी मागितले होते. मात्र, उच्च न्यायालयाने डीएसके यांची मागणी फेटाळून लावत ईडीने जप्त केलेले घर भाड्याने देण्याचं नकार दिला आहे. आज याप्रकरणी सुनावणी उच्च न्यायालयात न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर पार पडली.
दोन महिन्यांसाठी दरमहा ११ लाख रूपये भाडं देण्याची तयारी कुलकर्णी यांनी दाखवली होती. ईडीच्या ताब्यातील 'व्हिला नंबर १' बंगल्याबाबत दाखल केलेली याचिका आज उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीने जप्त केलेली मालमत्ता भाड्याने देण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाने अपिलेट ट्रिब्युनल म्हणजेच 'लवादा'कडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी डीएसके सध्या तुरुंगात आहे. त्याची सर्व संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यात त्याच्या बंगल्याचाही समावेश आहे. या बंगल्यात त्याचा सर्व परिवार राहात होता.