‘त्या’ नगरसेवकाच्या अटकपूर्व जामिनास हायकोर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 07:45 AM2021-01-09T07:45:57+5:302021-01-09T07:46:07+5:30
Crime News: गावडे यांच्यावर दहा गुन्हे नोंद आहेत. वसई-विरार महापालिकेचे गावडे हे विद्यमान नगरसेवक आहेत. ३१ मार्च ते १२ एप्रिल २०१८ यादरम्यान गावडे यांच्यावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मिळवून विकासकांना धमकी देत खंडणी वसूल करीत असल्याचा आरोप असलेल्या नालासोपारा येथील नगरसेवक धनंजय गावडे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
गावडे यांच्यावर दहा गुन्हे नोंद आहेत. वसई-विरार महापालिकेचे गावडे हे विद्यमान नगरसेवक आहेत. ३१ मार्च ते १२ एप्रिल २०१८ यादरम्यान गावडे यांच्यावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद झाले आहेत. या सर्व प्रकरणी जामीन मंजूर करावा यासाठी गावडे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. याबाबत मी व माझ्या सहकाऱ्यांनी जनहित याचिका दाखल करून वसई-विरार पालिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, पोलीस, पालिका व विकासकांनी मिळून माझ्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास सुरुवात केली, असे याचिकेत म्हटले आहे.
आरटीआयद्वारे मिळवलेल्या माहितीचा वापर विकासकांकडून खंडणी मागण्यासाठी करण्यात येत होता, असे पुरावे असल्याचे म्हणत सुनावणीदरम्यान न्या. संदीप शिंदे यांनी गावडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला.