प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; २८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:42 PM2021-07-06T21:42:03+5:302021-07-06T21:42:29+5:30
High Court relief to Pratap Saranaik : या याचिकांवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.
मुंबई : मनी लॉड्रिंगसह अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्यांची दोन मुले व निकटवर्तीय यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना २८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ईडीला दिले.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.(एनएसईएल) आणि टिटवाळा येथील एक जमीन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रताप सरनाईक, त्यांची मुले विहंग व पूर्वेश तसेच त्यांचे निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. ईडीच्या या कारवाईला सरनाईक, त्यांची मुले आणि चंडेला यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.
Bombay High Court gives relief to Pratap Sarnaik and family members and asks Enforcement Directorate not to take any coercive action till 28th July in the NSEL case
— ANI (@ANI) July 6, 2021
ईडीने बजावलेली समन्स रद्द करण्याची मागणी या चौघांनीही केली आहे. सरनाईक यांना आणखी एका प्रकरणात अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणांची अंडी जुन्या प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेऊ, असे म्हणत न्यायालयाने या चौघांनाही २८ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.