लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मॉडेलिंगच्या शुट साठी जातो, असे सांगून ती घराबाहेर पडायची आणि वेगवेगळ्या शहरात थांबून चक्क वेश्याव्यवसाय करायची. पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्या मॉडेलिंगचा मुखवटा गळून पडला. दरम्यान, नवऱ्याला हे माहित पडल्यास त्याच्यासमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा प्रश्न तिला सध्या सतावत आहे.
रश्मी (नाव बदललेले, वय २७) ही नोएडा येथील रहिवासी आहे. तीन मुलांची आई असलेल्या रश्मिकाने स्वत:ची उत्तमपणे देखभाल केलेली आहे. घरची आर्थिक स्थिती कोरोना काळात कोलमडल्याने ती दिल्लीतील दीपेश नामक दलालच्या संपर्कात आली. दिपेशचे ऑनलाईन वेश्याव्यवसायाचे नेटवर्क देशभरातील अनेक शहरात पसरले आहे. विशिष्ट कालावधीसाठी तो त्याच्या नेटवर्कमधील वेश्यांना वेगवेगळ्या शहरात पाठवतो. मैत्रीणीच्या माध्यमातून दीपेशच्या नेटवर्कमध्ये सहभागी झालेली रश्मी काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय करते. नवऱ्याला मात्र ती मॉडलिंग करते, असे सांगते.
मॉडलिंगसाठी शूटवर बाहेरगावी जात आहे, असे सांगून ती घराबाहेर पडते. गेल्या आठवड्यात रश्मी अशाच प्रकारे शुटवर जात आहे, असे सांगून घराबाहेर आली आणि नागपुरात येऊन वेश्याव्यवसाय करू लागली. मात्र, नागपुरात तिचे बिंग फुटले. मिळालेल्या टीपच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी रात्री रामदासपेठेतील हॉटेल ऑक्टेव्ह पार्कलॅण्डमध्ये आणि त्यानंतर वर्धा मार्गावरील हॉटेल फ्लोरा ईनमध्ये छापा घातला. या ठिकाणावरून दिल्ली, नोएडा येथील तीन देखण्या वारांगणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या जोसेफ कुट्टीलाही पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चौकशीत नोएडातील रश्मी कडून उपरोक्त माहिती उघड झाली. वेश्या व्यवसाय करताना नवऱ्याला मात्र मॉडेलिंग करण्याची थाप मारून ती घराबाहेर पडत होती. त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईचा बोभाटा झाल्यास नवऱ्याचा आणि घरच्या अन्य सदस्यांचा सामना कोणत्या तोंडाने करायचा, असा प्रश्न रश्मीला सतावत आहे.
त्या शरीर विकतात, तो कमाई खातो!प्रत्येकीच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था दिल्लीतील कथित दीपेश त्याच्या एजंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात करतो. कुण्या वारांगणेला तो देहविक्रयाच्या बदल्यात एका वेळीचे १ हजार तर, कुणाला दीड हजार देतो. स्वत: मात्र ग्राहकाकडून पाच हजारांपासून दहा हजारांपर्यंत वसूल करतो.
दीपेश कोण, खरा की खोटा ?या कारवाईनंतर पकडल्या गेलेल्या एजंट तसेच वारांगणांकडून पोलिसांना वेगवेगळी माहिती मिळाली आहे. देशभर ऑनलाईन प्रॉस्टीट्यूशनचे नेटवर्क चालविणाऱ्या दीपेशसह अनेकांची नावेही पुढे आली आहेत. मात्र, ही माहिती खरी की खोटी, त्याबाबत शंका आहे. वेश्या व्यवसायाच्या नेटवर्कमध्ये गुंतलेले सर्वच जण बनावट नावाने फिरतात. त्यामुळे दीपेशचे नाव आणि पत्ता किती खरा आणि किती खोटा, ते पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.