ऑनलाईन लवकर पैसे कमविण्याचा मोह महागात पडू शकतो. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने गेमिंग App वर कोट्यवधी रुपये जिंकण्याच्या लोभात ३० लाख रुपये गमावले. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने १३५ ट्रान्जेक्शन्समधून ३० लाख रुपये गमावले आहेत. सुरुवातीला गेमिंग App वर खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्या व्यक्तीने काही हजार रुपये गुंतवून दीड लाख रुपये कमावले होते.
सुरुवातीच्या कमाईतून अधिक पैसे कमविण्याची इच्छा निर्माण झाली. यानंतर, ती व्यक्ती एकामागून एक व्यवहार करून गेमिंग App वर पैसे गुंतवत राहिली. एवढी मोठी रक्कम गमावल्यानंतर, तक्रारदाराला आता तो एका सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याचं लक्षात आलं.
यानंतर व्यक्तीने १९३० वर याबद्दल तक्रार केली. १९३० हा सायबर हेल्पलाइन क्रमांक आहे. या टोल फ्री क्रमांकावर डायल करून कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवता येते. या क्रमांकावर सायबर फसवणुकीपासून वाचण्याच्या टिप्स देखील दिल्या आहेत.
या गेमिंग App चे इतर देशांशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. अशाप्रकारे लोक या गेमिंग App मध्ये अडकतात. सायबर क्राईमचे डीआयजी मोहित चावला म्हणाले की, गेमिंग App च्या नावाखाली लाखो रुपयांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
त्यांनी सांगितलं की, लोकांना सतत आवाहन केलं जात आहे की, पडताळणीशिवाय अशा एप्सवर पैसे गुंतवू नका. अशा बहुतेक घटना सावधगिरीच्या अभावामुळे घडत आहेत. हिमाचल प्रदेशात २०२४ मध्ये सायबर गुन्ह्यांच्या ११,८९२ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.