"माझ्या मुलीने पक्षासाठी जीव पणाला लावला, मला न्याय हवाय"; हिमानी नरवालच्या आईचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 14:23 IST2025-03-02T14:22:28+5:302025-03-02T14:23:01+5:30
Himani Narwal : भारत जोडो यात्रेदरम्यान हिमानी नरवालचा राहुल गांधींसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

"माझ्या मुलीने पक्षासाठी जीव पणाला लावला, मला न्याय हवाय"; हिमानी नरवालच्या आईचा टाहो
हरियाणातील रोहतक येथील सांपला शहरातील बस स्टँडजवळ एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह काँग्रेसच्या हिमानी नरवालचा होता. भारत जोडो यात्रेदरम्यान हिमानी नरवालचा राहुल गांधींसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आतापर्यंतच्या तपासात असं समोर आलं आहे की, हिमानीची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आला होता. मात्र अद्याप पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लावता आलेला नाही.
आजतकशी बोलताना हिमानीची आई म्हणाली की, "लोक माझ्या मुलीचा द्वेष करायचे. लोकांना वाटायचं की, ती इतक्या लहान वयात इतकी पुढे कशी गेली. मुलीच्या हत्येमागे पक्षातील एखाद्या सदस्याचा हात असल्याचा संशय आहे. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. कारण माझ्या मुलीने इतक्या लहान वयात पक्षासाठी जीव पणाला लावला होता."
"मी कोणालाही ओळखत नाही. पण पक्षातील बरेच लोक माझ्या घरी यायचे. अशा परिस्थितीत यामागे कोणीही असू शकतं. मी सरकार आणि प्रशासनाला विनंती करते की माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मी माझ्या मुलीसोबत होते. यानंतर, मी घरातून बाहेर पडले. मी २८ तारखेला तिला फोन केला तेव्हा फोन बंद होता. काठमांडूमध्ये एक कार्यक्रम होता, ज्यामध्ये हुड्डा साहेब येणार होते. तिला त्या कार्यक्रमाला जायचं होतं."
"माझी मुलगी गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसशी संबंधित होती. माझ्या मुलीला स्वच्छ राजकारण करायचं होतं. तिचे काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी अनेक वेळा वाद झाले. तिला तडजोड करण्यासही सांगण्यात आली. पण माझी मुलगी म्हणायची की मी जे योग्य आहे तेच करेन. यामुळे अनेक लोक तिच्या विरोधात होते."
हिमानीच्या आईला विचारण्यात आलं की, त्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलल्या आहेत का? यावर त्यांनी सांगितलं की, "मी हुड्डा साहेबांशी बोललो आहे. मी त्यांना ओळखते. मला फक्त एवढंच म्हणायचे आहे की माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मला न्याय हवा आहे. मारेकऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा व्हायला हवी. माझ्या मुलीच्या हत्येत कोणीही सहभागी असू शकतं कारण तिचे सर्कल खूप मोठं होतं."