कराची : पाकिस्तानातील अल्पसंख्यांकावर अनन्वित अत्याचार सुरू असल्याचे आरोप होत आहेत. इम्रान खान यांच्या माजी आमदारानेच भारतात येत पंतप्रधान मोदी यांच्याकडे आश्रय मागितला आहे. तर शरद पवार यांनी पाकिस्तानच्या लोकांची स्तुती केली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू मुलीच्या हत्येची घटना खळबळ माजविणारी आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या घोतकी भागात एक हिंदू मुलीचा डेंटल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मृतदेह आढळून आला आहे. लरकाना भागामध्ये असिफा मेडिकल डेंटल कॉलेज आहे. या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सोमवारी ही मुलगी मृत आढळली. तिचा मृत्यू गळ्याला रस्सीने आवळल्याने झाला आहे. कॉलेज प्रशासनाने हत्येचे वृत्त फेटाळले असून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
घोतकीमध्ये कट्टरवाद्यांकडून मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणानंतर हिंदू तरुणीची हत्या झाली आहे. हा वाद हायस्कूलच्या एका हिंदू शिक्षकाने ईशनिंदा केल्याच्या कथित आरोपामुळे सुरू झाला होता. त्यानंतर कट्टरवाद्यांनी या शाळेची आणि हिंदू मंदिरांची तोडफोड केली होती.
प्रकरण दाबण्याचे प्रयत्न या विद्यार्थीनिचे नाव नमृता चंदानी असे आहे. ती बीडीआसच्या शेवटच्या वर्षाला होती. तिचा मृतदेह गळ्याला रस्सी बांधलेला अंथरुणावर पडलेला होता. कॉलेज प्रशासन तिने आत्महत्या केल्याचे भासवत असून पुरावे मात्र हत्येकडे बोट दाखवत आहेत.
घटनास्थळावर असे पुरावे सापडले आहेत की, नमृताने बचावासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. एवढेच नाही तर तिचा मोबाईलही गाय़ब होता, तो नंतर पोलिसांनी शोधला. यामुळे संशयाला जागा मिळाली असून जर तिने आत्महत्या केली तर तिचा मृतदेह अंथरुणावर कसा काय आढळला. तिचा मृतदेह लटकलेला असायला हवा होता. नमृताचा भाऊही डॉक्टर आहे. त्याने सांगितले की तिच्या गळ्यावर दोरीचे व्रण होते. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, यासाठी लोकांनी पाठिंबा द्यायला हवा.
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. याच महिन्यात शीख मुलीचे अपहरण करण्यात आले आणि तिला एका मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न करण्याल भाग पाडण्यात आले. तसेच एका विद्यार्थिनीलाही असेच अपहरण करत मुस्लिम व्यक्तीच्या घरी नेऊन लग्न लावण्यात आले होते.