Hindu Woman assaulted Murdered in Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय संबंध गेली अनेक वर्ष तणावपूर्ण आहेत. पाकिस्तान हे जरी मुस्लीम राष्ट्र असले तरी तेथे अनेक हिंदू कुटुंब अजूनही वास्तव्यास आहेत. पाकिस्तानात हिंदू लोकांवर अत्याचार केले जातात असा आरोप भारताने अनेक वेळा केला आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीतही भारताने या मुद्द्यावर अनेक वेळा भाष्य केले आहे. मात्र तरीही पाकिस्तान सुधरण्यास तयार नाही. पाकिस्तानमध्ये एका हिंदू महिलेच्या हत्येची घटना घडल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
नक्की काय घडले?
एका हिंदू महिलेवर आधी बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्या महिलेचे शिर धडापासून वेगळे कापण्यात आले. महिलेच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले. हत्येनंतर महिलेचा मृतदेह शेतात फेकून देण्यात होता. पाकिस्तानमध्ये हिंदू महिलेवर झालेल्या अतिप्रसंगाबाबत आणि संतापजनक कृतीबाबत भारताने तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला आहे.
पाकिस्तानात कुठे घडला हा प्रकार?
हे प्रकरण पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. महिलेच्या हत्येनंतर हिंदू खासदार कृष्णा कुमारी घटनास्थळी पोहोचल्या होत्या. कृष्णा कुमारी यांनी घटनास्थळी लोकांशी संवाद साधून मदतीचे आश्वासन दिले. कृष्णा कुमारी यांनी ट्विट केले की, ४० वर्षीय विधवा महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. अत्यंत वाईट अवस्थेत मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते. हल्लेखोरांनी महिलेच्या मृतदेहाशी छेडछाड केली होती. सिंढोरो आणि शाहपूरचाकर येथील पोलिसांच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली होती.
भारताने पाकिस्तानला सुनावले!
पाकिस्तानने आपल्या देशात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी आणि आपली सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पाकिस्तानला सुनावले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, पाकिस्तानने अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी, असे आम्ही वारंवार सांगतो. त्यांची सुरक्षा ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. पाकिस्तानने अल्पसंख्याकांचे रक्षण करावे, एवढेच आम्ही सध्या तरी सांगतोय, असे ते म्हणाले.