मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या हिंदु युवकांना पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा गंभीर आरोप हिंदु विधीज्ञ परिषदेने केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत तपास अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात परिषदेचे अधिवक्ता अॅड. संजीव पुनाळेकर यांनी अनेक आरोप केले आहे. तसेच आरोपींसह तपास अधिकाऱ्यांचीची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
पुनाळेकर म्हणाले की, दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या शरद कळसकर याची भेट घेतली असता ही माहिती मिळाली. राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना कोल्हापूर तपास पथकातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याने बेलापूर येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात घुसून अमानुष मारहाण केली. तसेच कॉ. पानसरे प्रकरणातील सहभागाची कबुली न दिल्यास यापेक्षा गंभीर छळाला तोंड द्यावे लागेल, अशी धमकीही दिल्याचे शरद बोलताना कळाले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे यांची वकिलांनी सोमवारीच भेट घेतली असता शासनाच्या याच अधिकाऱ्याने नंदकुमार नायर यांच्या उपस्थितीत अत्यंत हिंस्रपणे मारहाण केल्याचे अंदुरे यांनी सांगितले.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली द्यावी म्हणून मारहाण करणारे अधिकारी कुटुंबांवर अत्याचार करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोपही पुनाळेकर यांनी केला आहे. तरी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आरोपींसह तपास अधिकाऱ्यांची नार्को चाचणी करण्याची मागणी पुनाळेकर यांनी केली आहे. प्रसंग पडल्यास आरोपींच्या वकीलांचीही नार्को चाचणी करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने केली आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान कार्यालय यांच्याकडे पाठवल्याचे संघटनेने स्पष्ट केले.