मुंबई-
इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचं आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमधून मुलामुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात जमण्याचं आवाहन करण्यात येत आहे. एका अमान नावाच्या मुलाच्या नावे ही क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
"मी अमान बोलतोय. ग्रूपचा अॅडमिन. मी वांद्र्यात आलोय. इथे मी चौकशी केली पण वकिलांकडे भाऊ नाहीत. भाऊंना निघून अर्धा ते पाऊण तास झाला आहे. आता भाऊ धारावीत पोलीस कोठडीत आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जास्तीत जास्त संख्येनं धारावीत या. आम्ही पण धारावीत जात आहोत. सर्वात जास्त आम्हाला मुलींची गरज आहे. मुली जास्त असतील तर पोलीस मारणार नाहीत. मीडिया पण आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घेऊन या", असं आवाहन करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी अचानक हजारो विद्यार्थी मुंबईत धारावी येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले होते. आंदोलन तीव्र झाल्यामुळे जमावाला थोपविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला होता. पण कोणतीही माहिती किंवा कल्पना नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणातव विद्यार्थी जमले कसे? त्यांचं नेतृत्त्व कोण करत होतं? असा सवाल उपस्थित झाला. त्यानंतर 'हिंदुस्थानी भाऊ'चं नाव यात समोर आलं. तोही या आंदोलनात उपस्थित होता. तसंच त्याचे काही इन्स्टाग्राम व्हिडिओ देखील समोर आले आणि त्या आधारावर मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून 'हिंदुस्थानी भाऊ' याला अटक केली.