वर्धा - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणामध्ये कोर्टाने आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवले आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी आरोपीला गुरुवारी कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. योगायोग म्हणजे या जळीतकांडामध्ये मृत्यू झालेल्या पीडित शिक्षिकेच्या द्वितीय स्मृतिदिनी म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी आरोपीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, हिंगणघाट जळीतकांडामधील आरोपी विकेश ऊर्फ विकी नगराळे याला माननीय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हत्येच्या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवल्यास त्याला दुसऱ्या दिवशी शिक्षा सुनावली जाते. त्यानुसार या प्रकरणामध्ये आरोपीला उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ७ च्या सुमारास नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जात असलेल्या प्रा. अंकिता पिसुड्डे हिला आरोपी आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल ओतून जाळले होते. यात गंभीररीत्या जखमी झालेल्या अंकिताला उपचारार्थ नागपुरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १० फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजले होते. दोन वर्षे या खटल्याची सुनावणी चालली होती. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांना सरकारी वकील दीपक वैद्य यांनी सहकार्य केले. त्यानंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल आता जवळ आला असून, उद्या आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे.