Hinganghat Verdict: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून मारण्याची दुर्घटना दोन वर्षांपूर्वी घडली. या प्रकरणातला आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याने आज न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अंतिम सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाची बाजू मांडताना अॅड. उज्जवल निकम यांनी कोर्टात अनेक दाखले दिले. अतिशय क्रूर मनोवृत्तीने घडलेल्या या जळीतप्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. अशा प्रकरणातील आरोपी हे हैवानच असल्याची भावना व्यक्त करत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विकी नगराळेला फासावरच लटकवायला हवं होतं, अशी भूमिका मांडली.
"हिंगणघाटच्या निर्भयाला जाळून मारणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा झालीये. खरं तर अशा नराधमांना फासावरच लटकवायला हवंय…. ही माणसं नाहीतच, हे तर हैवान आहेत. न्यायालयाचा निकाल आला परंतु शासनाने या परिवाराला दिलेल्या लेखी आश्वासनांची पुर्तता अद्याप केलेली नाही हे दुदैवी आहे", असं ट्वीट त्यांनी केलं. चित्रा वाघ यांनी सोबत आपलं मत सविस्तर मांडणारा एक व्हिडीओही पोस्ट केला केला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी शासनाकडे अशी मागणी केली की या आरोपीला फासावर लटकवण्यासाठी आता राज्य सरकारनेच पावलं उचलायला हवीत.
दरम्यान, हिंगणघाट जळीतप्रकरणाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणातील आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी बुधावारी स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केंद्रस्थानी ठेवत आरोपीच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यावर गुरुवारी निकाल जाहीर केला जाईल असं अॅड. उज्जवल निकम यांनी सांगितलं होतं. त्यानुसार या प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या संपूर्ण सुनावणीच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हिंगणघाटमधील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर प्राध्यापिका नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात होती. त्यावेळी आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी पीडितेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना १० फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले होते.