हिंगोली : सरकारी योजनांची माहिती देण्याचा बहाणा करून वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिचा खून करणाऱ्या सीरियल किलरला हिंगोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा नेहमीच पोलिसांच्या अवती-भोवती राहत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय येत नव्हता. मात्र, ९ एप्रिल रोजी साखरा येथील वृद्ध महिलेच्या खुनाच्या तपासात त्याचे बिंग फुटले अन् तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दिलीप अंबादास लाटे (३२) असे या आरोपीचे नाव आहे. सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई मारोती इंगळे (८२) या वृद्ध महिलेचा खून करून अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटत मृतदेहाजवळच असलेल्या माळरानावर अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. साखरा गावात यापूर्वीही एका वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सर्वच दिशांनी तपास सुरू केला. त्यानुसार साखरा येथीलच दिलीप अंबादास लाटे हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
हिंगोलीत पोलीस मित्रच निघाला सीरियल किलर, तपासात बिंग फुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 4:12 AM