मीरारोड - अनाथ पोलीस कन्येला अपशब्द वापरुन मारहाणीप्रकरणी भाजपा नगरसेवकासह त्याच्या पत्नी व मुलीला काशिमीरा पोलीसांनी अटक केली आहे. दसऱ्याच्यादिवशी नवरात्रीत देवी विसर्जनावेळी ही घटना घडली होती. सुरवातीला पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र, मुलीवरील अन्यायाला सोशल मीडियामुळे वाचा फुटल्यानंतर शिवसेना, मराठा मोर्चा आदी आक्रमक झाले होते.
मीरारोडच्या सुंदर सरोवर वसाहतीमध्ये सायली राजेंद्र घाग ही लहान भावासह राहते. सायलीचे वडील हे पोलीस दलात होते. तिच्या सख्ख्या आई - वडिलांचे निधन झाल्याने शेजाऱ्यांनी सायली व तिच्या भावाचे लहान असल्यापासून पालन पोषण केले. दोघे पालनकर्ती आई माधवी व वडिल मुरलीधर आंब्रें यांच्यासह राहतात. सायली ही गोरेगावला खाजगी कंपनीत कामाला आहे. वसाहतीत नवरात्र असल्याने दसऱ्याच्या दिवशी १८ आॅक्टोबर रोजी विसर्जनावेळी गरबा आयोजित केला होता. त्यावळी सायली ही मैत्रीणींसह नाचत होती. साडे दहाच्या सुमारास गाणी बंद केली म्हणून सायली व तिच्या मैत्रीणींनी वाढदिवसाचे राहिलेले गाणे तरी पुर्ण करा असे सांगू लागल्या. त्यावरुन वसाहतीत राहणारे भाजपाचे प्रभाग १८ चे नगरसेवक दौलत गजरे यांच्या पत्नी कमल यांनी दमदाटी व शिवीगाळ करुन मारहाण सुरु केली. गजरे यांची मुलगी आकांक्षा हीने देखील येऊन मारहाण केली. सायलीच्या गळ्यातील दुपट्टा आवळला. तिच्या मैत्रिणी व अन्य लोकांनी हे भांडण सोडवले. त्यानंतर सायली आपल्या मैत्रिणींसह टाक्या धुत असताना कमल व आकांक्षा यांनी येऊन पुन्हा मारण्यास सुरवात केली. नगरसेवक दौलत गजरे यांनी देखील मारहाण करण्यास चिथावणी देऊन तुला नग्न करुन मारु असे धमकावले. सायलीचे कपडे फाडण्यात आले. तिची पालनकर्ती आई आल्यावर तिची सुटका करुन घरी नेले. पोलिसांना तक्रार केल्यावर पोलिसांनी सुरवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र, घडल्या प्रकाराची सोशल मीडियावर तसेच परिसरात चर्चा सुरु झाल्यानंतर मराठा मोर्चाच्या सदस्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. तर दुसरीकडे गजरे यांच्याकडून अॅट्रोसीटी दाखल करण्याचा इशारा दिला जाऊ लागला.
शिवसेनेचे खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह शिवसैनिकांनी रविवारी रात्री काशिमीरा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना त्या अनाथ मुलीला न्याय द्या व गुन्हा दाखल करुन गजरेला अटक करण्याची मागणी केली गेली. मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळाने देखील पोलिसांना भेटून आरोपींना अटक करा असा आग्रह धरला. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे व पोलीस पथकाने नगरसेवक दौलत गजरेसह पत्नी कमल व मुलगी आकांक्षा यांना अटक केली आहे. गजरेने पोलिसांच्या गाडीत बसण्यावरुन शिंगारे व पोलीसांशी हुज्जत घातली.