नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी देखील रात्रं-दिवस काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला एका तरुणीने कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या हिसारमध्ये ही घटना घडली आहे. एका रुग्णालयात तरुणी आणि एक तरुण आपल्या नातेवाईकाला उपचारासाठी घेऊन आले होते.
रुग्णावर वेळेत उपचार होणं गरजेचं होतं. मात्र खूप वेळ झाला तरी कोणताच डॉक्टर रुग्णालयात दिसत नव्हता. बराच वेळ या तरुणीने डॉक्टरांबद्दल विचारणा केली. मात्र कोणीच आलं नाही. शेवटी आपत्कालीन विभागाजवळ एका खोलीत डॉक्टर आणि दुसरी एक व्यक्ती झोपलेलं असल्याचं दिसलं. तरुणीने हा सगळा घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरुणी ज्या व्यक्तीसोबत बोलत आहे, तो ड्यूटीवर आराम करीत आहे. तर दुसरीकडे एक व्यक्ती बेडवर अंगावर पांघरून झोपली आहे. यानंतर तरुणी आणि डॉक्टरांमध्ये वाद झालेला पाहायला मिळतो.
ड्यूटीवर असताना तुम्ही कसे काय झोपता? असा सवाल तरुणीने डॉक्टरांना केला आहे. त्यानंतर रागाच्या भरात डॉक्टर ओपीडी रुममध्ये आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. तरुणी डॉक्टरचा व्हिडीओ अनिल विज याला पाठविण्याची धमकी देते. ज्यानंतर डॉक्टर तरुणीचा मोबाइल खेचून घेतो. तरुणी डॉक्टरला फोन परत देण्यास सांगते. मात्र तो फोन देण्यास नकार देतो. यानंतर फोन खेचाखेचीमध्ये तरुणी डॉक्टरच्या कानशिलात लगावते. डॉक्टरचं हे कृत्य मोबाईलमध्ये कैद झालं आहे आणि हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
डॉक्टराने आपल्या कर्मचाऱ्यांसह ओपीडीचा बहिष्कार करीत तरुणीवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला आहे. ज्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि सोबत आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. डीएसपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला रुग्णाला घेऊन तरुणी रुग्णालयात आली होती. मात्र त्यांनी डॉक्टरांसोबत गैरवर्तन केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या एकाला अटक करण्यात आली असून ते याचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.