लातूर - शहरातील रिंगराेड परिसरात असलेल्या एका ट्रान्सपोर्टनजीक थांबविण्यात आलेला ट्रक चालकाला मारहाण करुन पळविल्याची घटना २० ऑक्टाेबरला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना लातूरच्या पाेलीस पथकाने तेलंगणातून ट्रकसह ताब्यात घेतले. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुणाजी जयराम काेल्हे (४३ रा. दाभाडी ता. किनवट जि. नांदेड) यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच. २६ ए.डी. १६३१) लातूर येथील रिंगराेड परिसरात चालक सुदाम पांडुरंग कळके (५८ रा. कल्हाळ ता. जि. नांदेड) यांनी २० ऑक्टाेबरराेजी रात्री थांबविला हाेता. दरम्यान, रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एम.एच. ४२ ए.एक्स. ४९९९) पाच जण तेथे दाखल झाले आणि ट्रकमध्ये घुसले. यावेळी चालकाला चाकूचा धाक दाखविला. दांड्याने मारहाण करत गाडीत जबरदस्तीने बसवून वाहन शिरुर ताजबंद, मुखेड, नरसी नायगाव येथे नेला. पुढे बिलाेलीनजीक लाेहगाव येथे चालकाला गाडीतून उतरविण्यात आले. मारहाण करुन शिवीगाळ करुन, तुझ्या मालकाला काही सांगितले तर तुला ठार मारू, अशी धमकी दिली. यानंतर ते तो ट्रक घेवून निघून गेले.
याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांच्या सुचनेनुसार तपासाचे चक्र गतिमान करण्यात आले. पळविलेल्या ट्रकची जीपीएस यंत्रणा मुखेडनजीक काढण्यात आली. त्यानंतरही पाेलीस पथकाने पाठलाग करत माहिती मिळविली. ते तेलंगणा राज्यात गेल्याचा ठावठिकाणा लागला. याप्रकरणी शुक्रवारी ट्रकसह चालक पाेशट्टी विठ्ठल बाशट्टीवार (३९ रा. भैसा जि. निर्मल), मनाेज सायलू जायेवार (२९ रा. कुंडलवाडी) आणि राजू बबन चव्हाण (४१ रा. कुंडलवाडी, ता. बिलाेली जि. नांदेड) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, पाेहेकाॅ. दामाेदर मुळे, अभिमन्यू साेनटक्के, युसूफ शेख, बंटी गायकवाड, प्रमाेद देशमुख यांच्या पथकाने केल्याचे पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे म्हणाले.