मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात मृत गँगस्टर इकबाल मिर्ची (Iqbal Mirchi) यांच्या कुटुंबाची आणखी २२ .४२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये पाचगणीतील एक सिनेमा हॉलसह, मुंबईतील एक हॉटेल, फार्म हाऊस, दोन बंगले आणि भूखंडाचा आदींचा समावेश असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) जारी करण्यात आले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या इकबाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने ड्रग्ज तस्करी व हवालाच्या मार्फत देश- विदेशात कोट्यवधीची माया कमविली. मुंबईसह देशात विविध ठिकाणी रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडीने दीड वर्षापूर्वी त्याच्या कुटूंबियाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची आतापर्यंत सुमारे ८०० कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. त्याची पत्नी व मुलाविरुद्ध न्यायालय आरोपपत्र दाखल केले आहे. कोर्टाच्या परवानगीने मंगळवारी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये विविध सात बँक खात्यात ठेवी, मुंबईतील बंगला, फार्म हाऊस, भूखंड,पाचगणीतील टॉकीज आदींचा समावेश आहे.