बारामती : शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना गुुरुवारी(दि ७) दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.त्यातच भर पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याने दिवसभर हा विषय चर्चेचा ठरला. पोलीस ठाण्यात भर दिवसाअधिकारी,कर्मचाऱ्यांनाच मारहाण होत असेल तर सर्वसामान्य नागरीकांचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे.या मारहाणीत पोलीस अधिकाऱ्याची करंगळीफ्रॅक्चर झाली आहे. त्यामुळे नागरीकांच्या सुरक्षिततेबरोबरच पोलीसांच्याकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी पोलीस नाईक रामदासलक्ष्मण जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लाला आत्माराम पाथरकर (रा.आमराई ,बारामती)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात रामदास जाधव हे ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत होते. यावेळी गोदावरी लाला पाथरकर (वय ३०, रा. आमराई) ही महिला पती त्याने हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहे, असे ठाणे अंमलदारांना सांगत होती. यावेळी तिच्या पाठोपाठ तिथे आलेल्या लाला पाथरकर याने पोलिसांच्या समोरच पत्नीला हाताने मारहाण करायला सुरुवात केली. पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व शिपाई गायकवाड यांनी पाथरकर याला पत्नीला मारहाण करण्यापासुन रोखले.तसेच पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारांनी त्यांना कक्षाबाहेर काढले. त्यावेळी त्याने मुंढे यांना अर्वाच्च भाषेत बोलून मारहाण केली. मुंढे व गायकवाड यांनी त्यास बळाचा वापर करून पकडून ठेवले. तरीही त्याने घाणेरड्या भाषेत पोलिसांना शिवीगाळ केली.मी स्वत:ला काही तरी करून घेवून तुमच्या सर्वांना घोडा लावतो, अशी धमकीही त्याने दिली.याप्रकारे त्याने सरकारी कामकाजात अडथळा आणला. मुंडे यांच्या कानावर मारहाण करून उजव्या हाताची गरगळी फॅक्चर केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या घटनेत मुंढे यांच्या कानाला जबर मार लागला आहे. सुरवातीला सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर मुंढे यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले करीत आहेत. पाथरकर याच्यावर यापुर्वी अनेक गुन्हे दाखल आहे. लाल्या पाथरकरला पोलिसांनी बेड्या टाकून चौकातून फिरवत न्यायालयात नेले.
बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकासह, कर्मचाऱ्यालाच मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 4:09 PM