मुंबई - होळी, रंग पंचमीच्या आनंदाने साजरी कराच पण रंगाचा 'बेरंग' केल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल हे लक्षात ठेवा. कोणाच्याही मनाविरुद्ध कुणावर रंग अथवा फुगे फेकण्यास मनाई करण्यात आली आहे. रंग आणि फुग्यांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणा, गाणी गाण्यास बंदी घालण्यात आली असून असे आदेश मुंबई पोलिसांच्यावतीने जारी करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अटकेची कारवाई होऊ शकते असे मुंबई पोलिसांच्यावतीने बजावण्यात आले आहे.
मुंबईमध्ये होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चाळ, इमारती, गृहनिर्माण सोसायटी याचबरोबर रस्त्यावर, चौपाट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मुंबईकर रंगपंचमी साजरी करण्यासाठी गर्दी करतात. या उत्साहाला गालबोट लागू नये, जातीय हिंसाचार, कायदा आणि सुव्यवस्था बाधा पोहचू नये यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कुणाच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत तसेच अशा प्रकारची गाणी गाऊ नये. पादचारी तसेच इतर कोणावर मनाविरुद्ध रंग, पाण्याने किंवा रंगाने भरलेले फुगे टाकू नका. प्रतिष्ठा, संस्कृती, नैतिकचे भान राखावे असे पोलिसांनी नमूद केले आहे. कुणी तक्रार केल्यास अथवा पोलिसांच्या या आदेशाचे उल्लंघन करताना कुणी आढळल्यास भा. दं. वि. कलम १८८ अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवी होऊ शकते. हा दखलपात्र आणि जामीनपात्र गुन्हा असून अटक झाल्यास महिन्याभर शिक्षाही होऊ शकते. पोलिसांनी हे आदेश १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीसाठी जारी केले आहेत. त्यामुळे होळी, रंगपंचमी साजरी करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याचे भान ठेवा असे आवाहन मुंबई पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.