नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे. त्यांच्याकडून 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तुर्भे व तळोजा येथे दुकानात घरफोडीच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. या गुन्ह्यात सराईत सोनसाखळी चोराचा समावेश असल्याची शक्यता होती. त्यानुसार गुन्हे शाखा 1 चे पथक गुन्हेगारांच्या मागावर होते. यादरम्यान काही संशयित गुन्हेगार तुर्भे रेल्वेस्थानक जवळ येणार असल्याची माहिती हवालदार बालाजी चव्हाण व संतोष मिसाळ यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी सहायक निरीक्षक राहुल राख, रुपेश नाईक, हर्षल कदम, हवालदार रोहिदास पाटील, बालाजी चव्हाण, शशिकांत जगदाळे, संतोष मिसाळ, धनाजी भांगरे व दिपक मोरे यांचे पथक करण्यात आले होते. या पथकाने रविवारी तुर्भे स्थानकाबाहेर सापळा रचला होता.
यावेळी दोघेजण त्याठिकाणी एक गोणी घेऊन संशयास्पद वावरताना आढळून आले. यामुळे पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडील गोणीमध्ये चोरीचे मोबाईल व कपडे आढळून आले. तळोजा येथील उमेर अहमद बाऊद्दीन व कोपर खैरणेतील अविनाश कोरडे यांच्या दुकानातून त्यांनी हा माल चोरल्याची कबुली दिली. यानुसार त्यांच्याकडून 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सह आयुक्त डॉ. बी. जी. शेखर यांनी दिली. त्यात 52 मोबाईल, स्पीकर, हेडफोन तसेच कपड्यांचा समावेश आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून रिझवान खान (28) व जावेद शेख (22) अशी त्यांची नावे आहेत. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघेही कल्याण परिसरात राहणारे असल्याचे सह आयुक्त शेखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोपर खैरत येथील अविनाश कोरडे यांनी कर्ज काढून नवीनच कपड्यांचा व्यवसाय सुरु केला होता. अशातच घरफोडी झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले होते. परंतु गुन्हे शाखा पोलिसांनी वेळीच या गुन्ह्याची उकल करून काही प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल असून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.