डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरीचे गुन्हे वाढले असताना, स्थानिक पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करत, १२ आरोपींना अटक केली आहे. हे चोरटे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या चौकशीत आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.कल्याण-शीळ मार्गावर मोबाइल दुकानाचे शटर उचकटून तीन लाख ३६ हजार ३७७ रुपये किमतीचे मोबाइल, एलसीडी टीव्ही, असा मुद्देमाल चोरणाऱ्या शहजाद अन्सारी, समीर शेख आणि सद्दाम शेख या तिघांना गोवंडीतून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह चोरलेला एक लाख १८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात तीन दिवसांत ११ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, चोरीच्या वाढलेल्या घटनांवरून स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्याचबरोबर, रेकॉर्डवरील चोरीच्या प्रकरणातील जे गुन्हेगार जामिनावर कारागृहाच्या बाहेर आहेत, त्यांची शोधमोहीम राबविली. यात हद्दीत घरफोड्या, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक केली आहे.चेन स्नॅचिंगच्या २ गुन्ह्यांतील विनय प्रजापती, सुनील जैस्वार आणि भावेश भोईर यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर ७ नोव्हेंबरला कैलास भंडारी याच्यावर वार करून पसार झालेल्या कृष्णा कुशलकर आणि शुभम पेटेकर यांनाही पुणे येथून अटक केली आहे. १० मोबाइल, लॅपटॉप हस्तगतघरफोडीच्या गुन्ह्यात शेहजाद शेख, मुमताज शेख, इम्रान खान, इरफान शेख यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० मोबाइल, लॅपटॉप, म्युझिक सीस्टिम, बॅटऱ्या आणि रोकड असा ६२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घरफोडी, चेन स्नॅचिंग करणारे गुन्हेगार गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 2:58 AM