पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर दिल्ली, हरियाणा, पंजाब, युपीच्या सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या गँग चर्चेत आल्या होत्या. मुंबईवर एकेकाळी अशाच गँगचे वर्चस्व होते, ते पुरते मोडून काढण्यात आले. तेव्हाचे दादा -भाई एकतर परदेशात परागंदा झालेत नाहीतर तुरुंगात सडत आहेत. असे असताना आता दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील गँगचा खात्मा करण्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनीच लक्ष घातले आहे.
गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानंतर एनआयएने बिश्नोई आणि बवाना गँगच्या गँगस्टरांचे डोजिअरच तयार केले आहे. दिल्लीचा दाऊद म्हणून हे लोक मिरवत होते. आता त्यांची पळता भुई थोडी होणार आहे. एनआयएने बवाना गँग, बिश्नोई टोळीसह 10 गुंडांचे डॉजियर तयार केले आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपासाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
या टोळ्यांच्या लोकांवरही यूएपीए कलम लावण्यात येणार आहे. यासोबतच दिल्ली-एनसीआरसह हरियाणा, पंजाब, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध टोळ्या एनआयएच्या रडारवर आहेत. दिल्ली-एनसीआरमधील टोळ्या आणि सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पहिल्यांदाच एनआयएला कामाला लावण्यात आले आहे. दहशतवादाला समानार्थी बनलेल्या या टोळ्या टार्गेट किलिंग करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना फसवतात, असे एनआयएने म्हटले आहे.
हे दोन्ही सिंडिकेट दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात दहशत पसरवत आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली होती. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा सर्व टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी MHA मध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या, 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान MHA मध्ये 4 ते 5 बैठका झाल्या. या बैठकीत एनआयए, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल, एमएचए आणि आयबीचे अधिकारी उपस्थित होते. या गँगवर कारवाई करण्याचा निर्णय अमित शहांना कळविण्यात आला, त्यांनी लगेचच आदेश देत कारवाई करण्यास सांगितले आहे.