'काली' चित्रपटावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, मध्य प्रदेशात निर्मात्याविरोधात FIR होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:32 PM2022-07-05T20:32:48+5:302022-07-05T20:46:28+5:30
Kaali Controversy : 'काली' चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
भोपाळ : माहितीपट (डॉक्यूमेंट्री) 'काली' या चित्रपटाची निर्माती लीना मनिमेकलाई यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मध्य प्रदेशात चित्रपट निर्मात्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येणार असून चित्रपटावर बंदी घालण्यात येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर नाराजी व्यक्त करताना मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, पोस्टर अत्यंत आक्षेपार्ह आहे. 'काली' चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
माँ कालीचा अपमान सहन केला जाणार नाही
नरोत्तम मिश्रा म्हणाले की, माँ कालीचा अपमान सहन केला जाणार नाही. पोस्टर न काढल्यास कडक कारवाई करण्यात येईल. चित्रपटावर बंदी कशी घालायची याचा विचार केला जाईल. मी एफआयआर करायला सांगेन. असे चित्रपट केवळ हिंदू धर्मावरच का बनवले जातात, असा सवाल गृहमंत्र्यांनी या चित्रपटावर केला. देशात इतर धर्म मानणारे लोक आहेत. त्यांच्या धर्मावर असे वादग्रस्त चित्रपट का बनवले जात नाहीत?
वाद काय आहे?
2 जुलै रोजी चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या माहितीपट 'काली'चे पोस्टर शेअर केले होते. कॅनडा फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये (रिदम्स ऑफ कॅनडा) ही डॉक्युमेंट्री लाँच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. पोस्टरमध्ये माँ कालीच्या हातात सिगारेट आहे. एवढेच नाही तर या पोस्टरमध्ये एका हातात माँ कालीचा त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात LGBTQ समुदायाचा ध्वजही दिसत आहे.
दिल्ली, यूपीमध्ये तक्रार दाखल
चित्रपट दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात उत्तर प्रदेश आणि दिल्लीत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांना या निषेधाबद्दल तीव्र टीकेला सामोरे जावे लागले आहे. यूपीमध्ये लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात गुन्हेगारी कट रचणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून शांतता भंग करणे यासाठी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. येथे, दिल्ली पोलिसांनी वादग्रस्त पोस्टरच्या संदर्भात आयपीसीच्या कलम 153A आणि 295A अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.