- जमीर काझी, वरिष्ठ मुख्य उपसंपादक बईतील माहीम भागातील धनश्री तावरे या ३० वर्षांच्या विवाहित तरुणीने स्थानिक संजय सावंतच्या साथीने गेल्या काही महिन्यांत मांडवा, अलिबाग व आसपासच्या परिसरातील जमीनमालक व विविध साहित्याचा पुरवठा करणारे व्यावसायिक अशा किमान १२ ते १३ जणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करीत आपल्या मोहजाळात अडकविले. त्यांच्याबरोबर शारीरिक संबंधांची व्हिडीओ क्लिप बनविली. त्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवीत ब्लॅकमेल करीत लाखो रुपये उकळले आहेत. यापैकी काही जण सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र त्यांच्यापैकी केवळ दोघांनीच पोलिसांकडे तक्रार करण्याची हिंमत दाखवली. इतर अब्रू जाण्याच्या भीतीने मूग गुळून गप्प बसले आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासातून त्यांच्या व्हिडीओ क्लिप मिळाल्या आहेत. मात्र तक्रारदारच पुढे येत नसल्याने पोलिसही हतबल झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात बॉलीवूडचा किंग शाहरूख खान, स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीपासून ते दीपिका पादुकोन, आलिया भट यांसारखे सेलिब्रिटी आणि उद्योगपतींनी भूखंड खरेदी करून आलिशान फार्म हाऊस बांधले आहेत. हॉलिडे डेस्टिनेशन आणि फॅमिली गॅदरिंगसाठी महानगरातील गोंगाटापासून काहीशा दूर असलेल्या या निसर्गरम्य स्थळाला मुंबईतील कोट्यधीश प्राधान्य देतात.
ऐतिहासिक वारशाबरोबरच निसर्गाचा वरदहस्त लाभलेला रायगड जिल्हा अजून गोव्यासारखा ‘टुरिझम फ्रेंडली’ बनलेला नाही. मात्र सुमद्रमार्गे मुंबईपासून अवघ्या अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर असलेला रायगड जिल्हा देशातील बडे उद्योजक, बॉलिवूडचे सेलिब्रिटी यांचे हॉट डेस्टिनेशन बनला आहे. कोट्यधीश व्यक्तींनी येथे जमिनी घेऊन त्यावर मोठमोठे व्हिला बांधले आहेत. अलिबागच्या परिसर तर फार्म हाऊसने व्यापला आहे. जमिनीला मोल आल्याने स्थानिकांच्या हातात लाखो रुपये खेळायला लागले. मात्र येथेच घात झाला. जमीनमालकांच्या तरुण मुलांना मुंबईतील काही जण ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवित आहेत. त्यानंतर ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळवित आहेत.
जमिनीला सोन्याचे मोल विविध परदेशी, मोठ्या उद्योग समूहांनीही उद्योग उभारणीसाठी भूखंड खरेदी केले आहेत. त्यामुळे अलिबाग, किहीम, मुरुड, रोहा, रेवदांडा परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. एक गुंठ्याचा भाव १० ते १२ लाखांच्या खाली उतरत नाही. त्यामुळे काही जमीनमालक कोट्यधीश झाले आहेत. हातात पैसा खेळू लागल्याने त्यांना मनोरंजनाची अद्ययावत साधने, सुविधांचा मोह वाढत चालला आहे. त्यातूनच ‘हनी ट्रॅप’चे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत.
जाळ्यात ओढण्याची अशी आहे मोडस ऑपरेंडी ? जमीनधारक, व्यावसायिकांची माहिती मिळवून त्यांच्याशी संपर्क वाढविणे, त्यांना प्लॉट खरेदी करणे, व्यावसायिक गुंतवणूक करणार असल्याचे सांगून तरुणींकडून त्यांच्याकडे मदत मागितली जाते. भरमसाट कमिशन देण्याच्या आमिषाबरोबरच व्हाॅट्सॲप व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग सुरू केले जाते. मधाळ व मोहक बोलण्याबरोबरच अर्धनग्न, अश्लील फोटो पाठवून त्यांना मोहजाळात अडकवले जाते. त्यानंतर एखाद्या रिसॉर्ट, कॉटेजवर भेटण्यासाठी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. सावज पोहोचण्यापूर्वी तरुणी तेथे साथीदाराच्या मदतीने मोबाइल कॅमेरा लपवून ठेवते. सर्व चित्रीकरण करण्याची व्यवस्था केलेली असते. सावज टप्प्यात आल्यानंतर दोन-चार दिवसांनी अनोळखी नंबरवरून संबंधित व्यक्तीला ‘ती’ व्हिडीओ क्लिप पाठवली जाते. त्याची पत्नी व अन्य नातेवाईक आणि सोशल मीडियावरून क्लिप व्हायरल करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल केले जाते. अब्रू जाण्याच्या भीतीपोटी संबंधित मंडळी हव्या त्या रकमेवर तडजोड करतात.