- संतोष सापतेश्रीवर्धन - चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशी कथा असलेल्या कलाकाराला साजेसा अभिनय, उत्कृष्ट पूर्व नियोजन, अचूक माहिती व योग्य सावज... अशा विविधतेने परिपूर्ण श्रीवर्धन ‘हनी ट्रॅप’ हे पांढरपेशी कृत्य आहे. समाजातील विकृतीचे चित्र श्रीवर्धनमधील तरु णाच्या फसवणुकीच्या घटनेमुळे समोर आले आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पीडित तरुणाला माणगाव येथील लॉजवर बोलावून त्याच्याकडून कथित तरुणीने पैसे घेऊन त्यानंतर त्याच्या सोबत अवैध कृत्य करण्याचे नाटक केले. पूर्वनियोजनानुसार सोबतच्या व्यक्तींनी रेकॉर्डिंग करून पीडित व्यक्तीला १५ लाख रुपयांची मागणी करत मारहाण करत निजामपूर येथील जंगलात नेले. त्यानंतर संबंधित पीडित व्यक्तीने, श्रीवर्धनला चला पैसे देतो, असे सांगितल्यानंतर ते पीडित व्यक्तीस श्रीवर्धनला घेऊन आले. आपण मुलीचे भाऊ व नातेवाईक असल्याचा बनाव करत आरोपी श्रीवर्धनमध्ये आले. सोबत नकली पत्रकाराची भूमिका बजावणारा व्यक्ती होताच. या पत्रकाराने पैसे घेऊन तडजोड करू अशी भूमिका घेतली. सुरुवात १५ लाखांपासून झाली. पीडित व्यक्ती पैशाच्या शोधात मित्राकडे पोहोचला, जवळपास लाख रुपयांची जुळवणूक करण्यात आली त्यानंतर रक्कम पीडित व्यक्तीच्या मित्राच्या दुकानात देण्याचे ठरले. त्या वेळी मुलीची आई असलेला अभिनय करणाऱ्या महिला आरोपीची नाव सांगताना चूक झाली. मुलगी व बहिणीची मुलगी अशी बतावणी करण्यास महिला आरोपीने सुरुवात केली. त्या वेळी पीडित व्यक्तीच्या मित्राला संशय आला. तेव्हा या महानाट्याचा उलगडा होण्यास सुरुवात झाली.श्रीवर्धन पोलीस ठाण्यात पीडित व्यक्तीने धाव घेतल्यानंतर पोलिसी खाक्या समोर आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्यास सुरुवात केली. या आरोपीने नियोजनपूर्वक हे कृत्य घडवून आणले होते. समाजातील ठरावीक धनदांडग्या लोकांना लक्ष्य करण्याचे काम ही टोळी अनेक दिवसांपासून करत आहे; परंतु पीडित व्यक्ती समाजातील प्रतिष्ठेला धक्का लागेल व समाजातील आपली मानहानी होईल या भीतीने पोलिसांकडे जात नसे त्यांचा फायदा या टोळीतील आरोपीने पुरेपूर घेतला.दोन महिला आरोपींचा शोध सुरूश्रीवर्धन शहरातील दुस-या एका पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार आरोपीने पीडित व्यक्तीस नियोजनानुसार अश्लील अवैध संबंधाचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. सोन्याची चेन व पैसे असे एकूण ९२ हजार रुपये हडप करण्यात आले, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील भूषण विजय पतंगे, विशाल सुरेंद्र मोरे, कुणाल यवनेश्वर बंदरी, सिद्धार्थ महेश मोरे, अलका मोहन ठाकूर, जगदीश गणपत ठाकूर, अक्षय सुनील दासगावकर या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तसेच शौकत काझी याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित दोन महिला आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही.
हनी ट्रॅप : श्रीवर्धनमध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 1:31 AM