विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत व्यावसायिकाला जेवणात गुंगीचे औषध देवून त्याचे आक्षेपार्ह फोटो काढत त्याच्याकडून खंडणी उकळणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'हनी ट्रॅप' करणारी ही महिला पोलिस कोठडीत पोहोचली आहे.
रायसोनी नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली. तिने आपण सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून तिचे पती रेल्वेत टी.सी. असल्याचे व्यावसायीकाला सांगितले. ती ७ मार्च रोजी धुळे येथे या व्यावसायिकाला भेटली. तेथे जेवणात गुंगीचे औषध देत एका फ्लॅटवर घेवून गेली व व्यावसायीकाचे आक्षेपार्ह फोटो काढून नंतर तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
त्यानंतर महिलेने व्यावसायीकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच तू माझ्यासोबत रिलेशनशीप सुरु ठेव, नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. याशिवाय मी गरोदर असल्याचे सांगत त्या महिलेने व्यावसायीकाकडून तीन लाख रुपये उकळले.
घरी जाऊन पती-पत्नीला मारहाण
काही दिवसांपूर्वी या महिलेने व्यावसायीकाच्या घरी जाऊन १५ लाखांची मागणी केली. तसेच व्यावयीकासह त्यांच्या पत्नीला लोखंडी सळईने मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची चैन व त्यांच्या पत्नीचे ३० ग्रॅमचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून तेथून निघून गेली. शेजारच्यांनी व्यावसायीक दाम्पत्याला त्या महिलेच्या तावडीतून सोडवित त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर व्यावसायीकाने त्या महिलेबाबत माहिती काढली असता, ती महिला अशाच प्रकारे अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे वसुल करीत असल्याचे समोर आले. त्या महिलेविरुद्ध यापूर्वी जळगाव शहर व भडगाव पोलिस ठाण्यात हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले.
वेगवेगळ्या नावांचा वापर
हनी ट्रॅपमध्ये अडविणारी महिला मूळची मुक्ताईनगर येथील असून सध्या रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिने दोन ते तीन वेगवेगळे नावे सांगितले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेला शुक्रवारी अटक केली. त्या महिलेला न्यायालयात हजर केले असता, तिला १५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.