हाँगकाँग - भारतात श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाचे आरोपी आफताबनं तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. ही घटना उघड होताच लोकांमध्ये खळबळ माजली होती. अशाच प्रकारे आणखी एक घटना घडली आहे. सोशल मीडियावर एका मॉडेलचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तिच्यासोबत घडलेल्या घटनेने सर्वांना हैराण केले आहे.
एबी चोई असं या मॉडेलचे नाव होते. जिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मॉडेलची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. फ्रीजमध्ये पाय सापडले तर उर्वरित मृतदेहाचे तुकडे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. हे प्रकरण हाँगकाँगचे आहे. यात पोलिसांनी चोईचा पहिला पती आणि त्याच्या नातेवाईकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ५ जणांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले की, घरातील एका भांड्यातही मृतदेहाचे अवशेष सापडले. हाँगकाँगची मॉडेल एबी चोईच्या हत्येप्रकरणी तिचे आधीचे सासरे आणि सासऱ्याच्या मोठ्या भावावर हत्येचा आरोप आहे. तसेच, तिच्या आधीच्या सासूवर न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी मॉडेलच्या २८ वर्षांच्या एक्स पतीला अटक केली. मॉडेल अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. ती कुठे गेली हे कोणालाच माहिती नव्हते.
कसा झाला हत्येचा खुलासा?हाँगकाँगमधील ताई पो गावात शुक्रवारी पोलिस अधिकाऱ्यांना महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले तेव्हा ही बाब उघडकीस आली. गावातील एका घरातील फ्रिजमध्ये हे तुकडे ठेवले होते. या घरातून इतर वस्तूही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अॅलन चुंग यांनी शनिवारी दिली. त्यात मीट ग्राइंडर, करवत, रेनकोट, हातमोजे आणि मास्क यांचा समावेश आहे. एबी चोईचा तिचा एक्स पती आणि त्याच्या कुटुंबाशी आर्थिक वाद सुरू होता असं तपासात आढळले.
पोलिसांना फ्रीजमध्ये महिलेचे कापलेले पाय सापडले. तोपर्यंत हे पाय चोईचे होते की दुसऱ्या महिलेचे हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र घराची झडती घेतली असता चोईचे ओळखपत्र, क्रेडिट कार्ड आणि इतर सामानही घरात आढळून आले. त्यामुळे कापलेला पाय तिचाच असल्याची पुष्टी झाली. घटनास्थळी चोईचे डोके, धड आणि हात आढळून आले नाहीत. पोलीस अजूनही या भागांचा शोध घेत आहेत.