वैभव गायकर
पनवेल :महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशियनच्या वतीने इंडीयन बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या मान्यतेने खारघर येथे दिनांक १३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या "मास्टर महाराष्ट्र श्री २०२१ या शरीरसौप्ठव स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाकडून खेळताना ८० किलो वजनी गटामध्ये महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावत एक नव्या यशाला गवसणी घातली आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये मेडल मिळविणारे सुभाष पुजारी हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस आधिकारी आहेत. आपली नोकरी संभाळून दिवसातून किमान 5 तास व्यायाम करणारे पुजारी हे खऱ्या अर्थाने तरुणांना प्रेरणा देणारे अधिकारी ठरले आहेत. या कामगिरीमुळे पुजारी यांची २० व २१ मार्च रोजी लुधियाना पंजाब या ठिकाणी होणा-या मास्टर भारत श्री २०२१" या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या या यशाबददल पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विनय कारगांवकर, डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड ,शत्रुघ्न माळी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.सुभाष पुजारी हे सद्या सुनित जाधव, (एशिया श्री) आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटटू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. या यशामध्ये अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, चेतन पठारे तसेच वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोशियन यांचे विशेष सहकार्य लाभले असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.