उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारच्या रात्री एक भयानक अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराचा अपघात झाला आणि बाईकसह त्याला आगीने वेढले. तरुणाच्या छातीच्या खालील शरीराला आग लागली होती. दुचाकी घसरल्यानंतर ती त्याच्या पायावर पडल्याने तो तिच्याखालून बाहेर पडू शकला नसावा, असा अंदाज बांधला जात आहे.
त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी ते पाहताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काहींनी काहीतरी करून त्याला लागलेली आग विझविली परंतू त्यात तो गंभीर भाजला होता. जखमी अवस्थेतच त्याला हॉस्पटलला नेण्यात येत होते. वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
शनिवार-रविवारच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लखीमपूर ते लखनौला जाणाऱ्या राज्य महामार्गावरील ऑइल टाऊनजवळ रस्त्याच्या मधोमध एक पल्सर दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेला काहींना दिसला. दुचाकी आणि त्याच्या अंगाला आग लागली होती. तरुणाच्या छातीचा खालचा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. काहींनी वाहने थांबवून त्याला लागलेली आग विझविली.
माती, पाणी आणि राख टाकून आग विझवण्यात आली. या घटनेची माहिती लखीमपूर खेरी पोलिसांना देण्यात आली. 108 वर फोन करून रुग्णवाहिकाही मागवण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंभीर जळालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणाविषयी माहिती मिळविली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.