तेलंगानाच्या खम्मम जिल्ह्यात इंजेक्शनद्वारे चालत्या मोटरसायकलवर पत्नीने पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. पोलिसांनी २४ तासांत आरोपींना पकडले असून अपघाताचा घातपात कसा होता, याची माहिती दिली आहे.
शेख जमाल बाईकवरून जात असताना त्याच्याकडे एका व्यक्तीने लिफ्ट मागितली. काही अंतर गेल्यावर त्या व्यक्तीने जमाल याला पाठीमागून विषाचे इंजेक्शन टोचले. या प्रकारामुळे जमाल याचा अपघाती मृत्यू भासविण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, असे झाले नाही आणि पत्नीचे बिंग फुटले.
जमालची हत्या त्याच्या पत्नीनेच केली होती. पोलिसांनी जमालच्या पत्नीसह, आरएमपी डॉक्टर आणि तीन जणांना अटक केली आहे. १९ सप्टेंबरची ही घटना आहे. जमाल सायंकाळी घरातून निघाला होता. त्याच्या छोट्या मुलीला भेटण्यासाठी तो आंध्र प्रदेशच्या सीमेवरील गावाला जात होते. वल्लभी गावाजवळ मंकी कॅप घालून उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. काही अंतर गेल्यावर त्या व्यक्तीने जमालच्या जांघेत इंजेक्शन खुपसले. यानंतर जमालला चक्कर येऊ लागली.
हे पाहून त्या व्यक्तीने जमालला बाईक थांबविण्यास सांगितले आणि तो तेथून पसार झाला. जमालला चक्कर येत होती, त्याने शेतात काम करणाऱ्या लोकांकडे मदत मागितली. त्याला शेतकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.
पोलिसांना काहीतरी संशय आला. यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. तेव्हा जमालच्या बाईकवर आणखी एकजण बसलेला दिसला. पोलिसांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली, तर जमालची पत्नी इमाम बी आणि रिक्षा चालक गोदा मोहन राव यांच्यातील प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या लफड्याला जमालचा विरोध होता. त्याचा काटा काढण्यासाठी इमाम बीने हा सारा खेळ रचला होता.