पिंपरी - कामाच्या शोधात भोसरीमध्ये आलेल्या कामगार कुटुंबातील महिलेने स्वत:च्या पोटच्या तीन मुलांना गळफास लावून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा अक्रम बागवान (वय २८), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय ९), झोया अक्रम बागवान (वय ७), मुलगा जिआन अक्रम बागवान (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी फातिमा यांचा पती अक्रम बागवान याने पोलिसांना माहिती दिली. बागवान कुटुंब चार दिवसांपूर्वी कामाच्या शोधात भोसरी येथे आले. काम शोधण्यासाठी अक्रम बागवान रविवारी (दि. २८) सकाळी साडेदहाच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर घरात असलेल्या त्यांच्या पत्नी फातिमा यांनी घरातील छताच्या हुकाला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्रम बागवान दुपारी चारच्या सुमारास घरी आले. घर आतून बंद असल्याने त्यांनी बराच वेळ दार वाजवले. मात्र दार कुणीही उघडले नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर चौघांचे मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेनासाठी हलविण्यात आले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. बागवान यांनी भोसरी येथे आल्यानंतर एका शाळेत मुलांना प्रवेश घेतला. मुलगी अलफिया चौथीत, झोया दुसरीत आणि मुलगा जिआन पाहिलीत शिकत होते.
कर्जबाजारीपणामुळे नैराश्यबागवान कुटुंब मूळचे कर्नाटकमधील बसव कल्याण येथील आहे. अक्रम बागवान फळ विक्रीचा व्यवसाय करतात. वारजे येथे व्यवसाय करताना त्यांना नुकसान झाले. त्यानंतर हे कुटुंब तळेगाव दाभाडे येथे गेले. तेथेही त्यांना व्यवसायात यश आले नाही. त्यामुळे ते कुटुंब कर्जबाजारी झाले. तसेच फातिमा यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे फातिमा यांना नैराश्य आले. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.