सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरात घरा समोर खेळणाऱ्या ६ वर्षाच्या देविका सोनू बाली हिचे अपहरण मावशी व मावशाने केल्याचे उघड झाले. गुन्हे अन्वेषण विभागाने ४८ तासात मुलीची सुटका केली असून देविकेला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात सोनू बाली कुटुंबासह राहत असून त्यांना ६ वर्षाची देविका ही मुलगी आहे. शुक्रवारी देविका घरा समोर खेळत असताना एका महिला व इसमाने देविकेला रिक्षात घालून नेले. असे प्रत्यक्षदर्शनी बघणाऱ्या नागरिकांनी सांगितले. मुलीचा शोधशोध केली असता मुलगी कुठेच मिळाली नाही. तसेच मावशी सरला गणेश मुदलीयार यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांचे फोन बंद होते. अखेर मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून सोनू बाली यांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यावर, शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या पथकाने समांतर तपास करून मावशी सरला मुदलीयार यांच्याकडून डिफेन्स अंबरनाथ येथून शनिवारी रात्री मुलीची सुटका केल्याचे पोलीस अधिकारी मांगले यांनी सांगितले.
मावशी सरला मुदलीयार हिला मूल नसल्याने, तिने पती गणेश मुदलीयार याच्या मदतीने, घरासमोर खेळणाऱ्या देविकाला रिक्षात घालून घेऊन गेले. तसेच याबाबतची माहिती न देता फोन बंद करून ठेवला होता. रिक्षात नेताना बघितलेल्या प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना मावशीचा संशय आला होता. शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने माहिती काढून देविकाची सुटका करून आई-वडिलांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सरला व तिचा पती गणेश मुदलीयार यांना अटक करून मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिले. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.