आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केली. दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरशी लग्न झालेली अनुषा येत्या काही दिवसांत बाळाला जन्म देणार होती. मिळालेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की ज्ञानेश्वरने अनुषाचा जीवच घेतला.
ज्ञानेश्वर स्केप्समधील सागर नगर व्ह्यू पॉइंटजवळ फास्ट-फूडचा व्यवसाय करतो. आज सकाळी त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की, अनुषा आजारी आहे. नातेवाईक आणि मित्रांनी अनुषाला रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. अनुषाचा मृतदेह केजीएच शवागृहातत ठेवण्यात आला होता.
ज्ञानेश्वरने पोलिसांसमोर कबूल केलं की त्याने त्याची पत्नी अनुषाची हत्या केली आहे. पोलिसांनी ज्ञानेश्वरला ताब्यात घेतलं आहे. अनुषाच्या आईने आणि मैत्रिणींनी ज्ञानेश्वरला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आणि इतर कोणत्याही महिलेला असं सहन करावं लागू नये असंही म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून तीन दिवसांपूर्वी असाच एक प्रकार समोर आला होता जिथे एका गर्भवती महिलेची हत्या करण्यात आली होती. राजकुमारी असं महिलेचं नाव होतं. ती गावातील रहिवासी सूरज लालची पत्नी होती. पती सूरज लाल बाराबंकी येथे मजूर म्हणून काम करण्यासाठी गेला होता. त्याने सांगितले की, काम न मिळाल्यामुळे तो दुपारी १ वाजता घरी परतला. घराचा दरवाजा उघडा होता, त्याने त्याच्या पत्नीला अनेक वेळा हाक मारली, पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा तो आत गेला तेव्हा त्याला दिसलं की राजकुमारीची हत्या करण्यात आली आहे.