धुळे : फुटलेली पाण्याची बाटली बदलून मागणाऱ्या नगाव येथील शेतकरी गुलाब पाटील यांच्यावर एका हॉटेल मालकाने लोखंडी खुरपीने हल्ला केला. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोरील एका हाॅटेलमध्ये हाणामारीची घटना मंगळवारी सकाळी घडली.
धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी गुलाब राजधर पाटील यांनी आपला शेतमाल धुळ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. ते बाजार समिती समोरील एका हॉटेलमध्ये गेले. त्यांनी पाण्याची बाटली विकत घेतली. ही बाटली फुटलेली असल्याने त्यांनी ती बदलून द्यावी अशी मागणी हॉटेल मालकाकडे केली. त्यामुळे संतापलेल्या हॉटेल मालकाने लोखंडाची खुरपी हातात घेऊन गुलाब पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
हा हल्ला टाळण्यासाठी पाटील यांनी हात आडवा केल्याने त्यांच्या हातावर वार झाला. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी जखमी शेतकरी गुलाब पाटील यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.