पुणे : कर्वेनगर येथे सुरु केलेल्या हॉटेल व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे कर्जबाजारी झालेल्या हॉटेलमालकाने सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केली. गेल्या दोन ते तीन महिन्यात त्याने चार सोनसाखळयांची चोरी केली असून त्याला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून आतापर्यंत ३० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजय श्रीधर हुले (वय ५३, रा.सिंहगड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय याचे कर्वे रस्त्यावर एक हॉटेल आहे. ते हॉटेल सुरु करण्यासाठी त्याने अनेकांकडून ३० ते ४० लाखांचे कर्ज घेतले होते. पुढे हॉटेलव्यवसाय न चालल्याने त्याच्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेला. अशावेळी देणेदारांचे कर्ज फेडण्याकरिता त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने सोनसाखळ्या चोरण्यास सुरुवात केली. संजय याच्याविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. साखळीचोरांवर नियंत्रण आणण्याकरिता सध्या पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. तपास पथकाचे कर्मचारी प्रफुल्ल चव्हाण व राजेंद्र लांडगे यांना हिमाली सोसायटीच्या रस्त्यावर पावसाळी जँकेट घातलेला एक संशयास्पद व्यक्ती दिसून आली. त्यानंतर त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय हुले असून चार सोनसाखळ्या चोरल्याचे सांगितले. या गुन्हयातून ३० लाख ७२ हजार रुपयांचा एकूण ९६ ग्रँम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. नवीन हॉटेल सुरु केल्यानंतर त्यात झालेल्या खर्चामुळे संजय कर्जबाजारी झाला होता. त्याचा हॉटेलव्यवसाय देखील तोट्यात सुरु होता. साधारण ३० ते ४० लाखांचे कर्ज असल्याने ती रक्कम परत करण्याकरिता त्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केल्याची माहिती अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे यांनी दिली. ही कामगिरी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबुलाल तांदळे, प्रफुल चव्हाण, राजेंद्र लांडगे, किरण राऊत, संदीप घनवटे यांनी पार पाडली.