इंदूर येथे आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका हॉटेल संचालकाने स्वत:वर गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला आहे. मृत युवकाने बेकायदेशीर पिस्तुलीतून गोळी मारली. त्याचसोबत मृत्यूपूर्वी त्याने ७ पानाचे सुसाईड नोट लिहून घराच्या भिंतींवरही काही मेसेज लिहिले. सुरुवातीच्या तपासात युवक मानसिक तणावाखाली असल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा कुटुंबात आई आणि भाऊ घरातील वरच्या मजल्यावर होते. तर आदित्यने खालच्या रुममध्ये स्वत:वर गोळी झाडली. सुसाईड नोटमध्ये आदित्यने ७ वर्षापूर्वीच वयाच्या ३० व्या वर्षी आत्महत्येचा विचार केला होता असं सांगितले. सुसाईडपूर्वी आदित्यने टीव्ही, दरवाजा आणि घरच्या भिंतीवर अनेक मेसेज लिहिले होते. त्याने हे मेसेज कुटुंब आणि मित्रांसाठी लिहिले होते.
एका मेसेजमध्ये लिहिलं होतं की, सर्व गेट मीच खोलले आहेत. माझ्या मृत्यूची बातमी सर्वात आधी पोलिसांना द्या. माझ्या कुठल्याही सामानाला हात लावू नका. सुसाईड नोटमध्ये त्याने स्वत:ला सिद्धू मूसेवालाचा फॅन म्हटलं आहे. एका निळ्या रंगाच्या थैलीवर आदित्यने काही गिफ्ट ठेवले होते. त्यावर लिहिले होते की, मी गोव्याहून मित्रांसाठी हे आणले आहे. परंतु त्यांना देऊ शकलो नाही. हे गिफ्ट माझ्या मित्रांना द्या, कोणते गिफ्ट कोणाला द्यायचे त्या मित्रांची नावे लिहून ठेवली होती. जी पिस्तुल आत्महत्येसाठी वापरण्यात आली ती त्याने २०१६ मध्ये बेकायदेशीरपणे खरेदी केली होती.
पोलिसांचा तपास सुरू
हॉटेल मालकाच्या कथित आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिकारी पप्पू लाल शर्मा यांनी म्हटलं की, मारुती नगरमध्ये राहणाऱ्या आदित्यने सुसाईड केले आहे. त्याने पिस्तुलमधून गोळी झाडून आत्महत्या केली, घटनास्थळावर सुसाईड नोटही आढळली आहे. आम्ही सर्व अँगलने तपास करत आहोत. ही बेकायदेशीर पिस्तुल त्याच्याकडे कशी आली, कोणाकडून ती विकत घेतली या सर्व बाजूने तपास होणार आहे.