गाझियाबाद – उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं फसवणूक करणारी टोळी समोर आली आहे. या टोळीनं एका डॉक्टर जोडप्याच्या घरी महिलेला घरकामासाठी पाठवले. त्यानंतर डॉक्टरच्या गतिमंद मुलासोबत बनावटरितीने लग्नाचे फोटो काढले आणि त्यानंतर २०० कोटी रुपये संपत्ती हडपण्याचा प्लॅन बनवला. सध्या पोलिसांनी या टोळीच्या मास्टरमाईंडला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, या टोळीने सर्वात आधी वृद्ध डॉक्टर जोडप्याच्या घरी महिलेला कामाला ठेवले. त्यानंतर या घरकाम करणाऱ्या महिलेसोबत डॉक्टरांच्या गतिमंद मुलाचे लग्न करण्याचे षडयंत्र रचले. वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांना सांगितले की, घरकाम करणाऱ्या महिलेसोबत डॉक्टरांच्या मुलाचे लग्न झाले आहे. मृत व्यक्तींच्या नावे असलेली कोट्यवधीची संपत्ती ताब्यात घेण्याचा हा डाव होता. यात जोडप्याच्या मुलीलाही धमकी देण्यात आली होती.
त्यानंतर मृत महिलेच्या मुलीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा हे कांड समोर आले. तपासात पुढे आले की, या घरकाम करणाऱ्या महिलेचे याआधीच ३ लग्न झाली आहेत आणि तिन्हीवेळा तलाक देण्यात आला आहे. पोलिसांनी या फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मास्टरमाईंडला ताब्यात घेतले त्याचसोबत टोळीतील महिला सदस्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
तपासात काय आढळले?
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता आरोपींनी लोकांच्या संपत्ती हडपण्यासाठी अशी फसवणूक करणारी टोळी बनवली. तक्रारकर्त्या आकांक्षा सिंह यांच्या आईची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी आरोपींनी त्यांची फसवणूक केली. डॉ. सुधा सिंह या मुरादनगरच्या यूआयएमटी कॉलेजमध्ये कुलगुरू होत्या. सचिन नावाच्या आरोपीने डॉ. सुधा सिंह यांच्याशी ओळख वाढवली. त्यांच्या घरी येणेजाणे सुरू केले. त्यानंतर सचिनने प्रिती नावाच्या महिलेला घरकामासाठी सुधा सिंह यांच्या घरी ठेवले.
सुधा सिंह यांचा मुलगा ५० टक्के गतिमंद आहे. सचिनने सुधा सिंह यांना बळी बनवत त्यांच्या मुलाचे लग्न प्रितीसोबत लावण्याचा बनाव केला. त्याची बातमी सुधा सिंग यांच्या मुलीला नव्हती. त्यानंतर सुधा यांचे निधन झाले. त्यानंतर आरोपीने कोट्यवधीच्या संपत्तीत हिस्सा मागितला. बंगल्यात काम करणाऱ्या महिलेने त्याचा ताबा घेतला. माहितीनुसार, डॉ. सुधा सिंह यांची संपत्ती जवळपास २०० कोटी इतकी आहे.