संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातसह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ५७ हजारांवर पोहचला आहे. तर १६ हजार १४२ जणांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे राज्य कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नागपूरमधील अजनी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन नोकराने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोकराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित महिलेचा व्हिडिओ काढून धमकी देणाऱ्या आरोपीच नाव चेतन खडतकर आहे. संबंधित महिलेचे पती सीए असून चेतन हा त्यांच्याकडे काम करतो. घरातच कार्यालय असल्याने चेतन याचा घरात सतत वावर असायचा. याच दरम्यान तो पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला. नोकर असल्याने महिला त्याकडे दुर्लक्ष करायची. ६ जुलैला महिला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. याचदरम्यान चेतन याने महिलेचा मोबाइलद्वारे व्हिडिओ काढला, असं संबंधित महिलेने तक्रारीत सांगितले आहे.
आरोपीने व्हिडिओ काढल्यानंतर त्याने महिलेच्या घरातीलच संगणकावर धमकीचे पत्रही तयार केले. हे पत्र पीडित महिलेला पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. सुरुवातीला तिने चेतन याच्या काही मागण्या मान्य केल्या. तो महिलेशी अश्लिल चाळे करायला लागला. त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिला. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने आंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीने धमकी दिल्यानंतर संबंधित महिलेने घडलेला सर्वप्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पतीसह महिलेने पोलीस स्थानकात जाऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपी चेतन याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.