पिंपरी : जेवणातून काहीतरी गुंगीचे औषध दिले. घरातील व्यक्ती बेशुध्द झाल्यानंतर सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा ३ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. पिंपरीतील महेशनगर येथे मंगळवारी (दि. ११) हा प्रकार घडला. घरकाम करणाऱ्या दोघांविरूध्द पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता (वय ३०), महेश (वय ४०, दोघेही रा. नेपाळ, दोघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्राची दीपक नेरकर (वय २१, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी गीता आणि महेश फिर्यादी प्राची यांच्या राहत्या घरी घरकाम करण्याची नोकरी करतात. आरोपी गीता आणि महेश यांनी चोरीच्या उद्देशाने मंगळवारी जेवणात काहीतरी गुंगीचे औषध मिसळले. फिर्यादींचे वडील दीपक, आजोबा काशिनाथ व आजी सुमन यांना गुंगीचे औषध मिसळलेले जेवण दिले. त्यामुळे वडील दीपक, आजोबा काशिनाथ आणि आजी सुमन बेशुध्द झाले. त्यानंतर आरोपी गीता आणि महेश यांनी घरातून सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
घरगड्यांनी जेवणातून गुंगीचे औषध देऊन लंपास केला सव्वातीन लाखांचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 5:22 PM