ठाणे - आपल्याच मालकिणीकडे १३ लाख ७९ हजार रुपयांच्या ३६ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या या मोलकरणीला नौपाडा पोलिसांनी अटक केली. दीपाली सुखदरे (१८, रा. मुंब्रा, ठाणे) असे तिचे ना असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली. तिच्याकडून चोरीतील ११ लाख ५० हजारांचे ३३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
घंटाळीदेवी मंदिर रोड येथील रचना को-ऑप. हाउसिंग सोसायटीतील ज्योती वीरा (३८) यांच्या घरातून ३६ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार २० ऑगस्ट २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी तांत्रिक माहितीच्या आधारे शिताफीने तपास करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने दीपालीला अलीकडेच अटक केली. चोरीतील ३६ तोळ्यांपैकी ३३ तोळ्यांचे दागिनेही तिच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. या चोरीनंतर तिने वीरा यांच्याकडील काम सोडले होते. एका कार्यक्रमाला जाण्यासाठी वीरा यांनी जेव्हा दागिन्यांची शोधाशोध केली, त्यावेळी त्यांच्या निदर्शनास चोरीचा प्रकार आला. त्यांच्याकडील मोलकरीण मात्र त्याआधी तीन महिन्यांपूर्वीच काम सोडून गेली होती. नौपाडा पोलिसांनी दीपालीला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. सुरुवातीला आपण ही चोरी केली नसल्याचा दावा करणाºया दीपालीने नंतर मात्र चोरीची कबुली दिली.