- मनीषा म्हात्रे
मुंबई : झटपट पैसे कमाविण्यासाठी उच्चभ्रू घरातील गृहिणीचा ड्रग्ज तस्करीत कल वाढत असल्याचे धक्कादायक चित्र केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) कारवाईतून समोर येत आहे. एनसीबीने, वर्षभरात २३० जणांवर कारवाई करत, १ हजार ७९१ किलो ड्रग्ज जप्त केले. या आरोपींमध्ये १५ महिला आहेत.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करीसाठी आधीपासून महिलांचा वापर करण्यात येत आहे. यात उच्चभ्रू घरातील गृहिणीही सहभाग घेत असल्याने ही चिंतेची बाब झाली आहे. १० ते १५ टक्के महिला तस्कर आहेत. या महिलांविरुद्ध कारवाई करताना यंत्रणांसमोर अडचणी येत आहेत.
कारवाईपासून वाचण्यासाठी मुलाचा घेतला आधार...नागपाडा येथील रहिवासी हुसेन बीकडून (४१) हिच्याकडून एनसीबीने जुलै महिन्यात १.८ किलो ड्रग्जचा साठा जप्त केला होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून हुसेन ही १३ वर्षाच्या मुलाचा या कामात वापर करत होती.
अँफेटामाइनची परदेशात ओढ... अँफेटामाईनची दुबई, मालदीव ऑस्ट्रेलियामध्ये क्रेझ वाढत असल्याचेही एनसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात हे ड्रग्ज तयार करून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे एनसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे.
ड्रग्ज तस्करीचा बदलता ट्रेण्ड... एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षभरात कुरिअरद्वारे ड्रग्ज तस्करीवर भर दिल्याचे पाहावयास मिळाले. त्यात कुरियर कंपनीद्वारे पाठविण्यात येणाऱ्या ड्रग्ज पार्सलवरील नाव, पत्ता बनावट असल्याचेही तपासात समोर आले आहे तसेच कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने हे ड्रग्ज लपविण्यात आले होते. या रॅकेटमध्ये कुरियर कंपन्याचा सहभाग आहे का, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
गुजरातमधून अटक १० सप्टेंबर : एनसीबीने गुजरातमधून रूबिना शेखला अटक केली. जुलैपासून ती एनसीबीच्या रडारवर होती.