मुंबई: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी लेकिसोबत खरेदीला गेलेल्या महिलेला हजारोंचा फटका बसला. याप्रकरणी त्यांनी मालाड पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पूर्वा आडीवरेकर (२५) ही गोरेगाव पूर्व परिसरात राहत असून तिचे वडील पालिकेमध्ये नोकरी करतात. पूर्वा ही २१ जानेवारी रोजी तिची आई रोहिणी यांच्यासोबत मालाड पश्चिमच्या नटराज मार्केटमध्ये खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी रोहिणी यांनी त्यांच्या सोबत त्यांचा मोबाईल आणि १० हजार रुपयांची रोकड ठेवली होती.
मालाड रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या हनुमान मंदिराच्या बाजूला त्या पावणे सहाच्या सुमारास केस विंचरण्याच्या फण्या खरेदी करण्यासाठी थांबल्या तेव्हा त्यांनी त्यांची पर्स तपासली. मात्र ती त्यांना आढळली नाही. पर्स आणि त्यात ठेवलेला मोबाईल सगळीकडे शोधूनही कुठे सापडला नाही. अखेर तो अनोळखी चोराने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार याप्रकरणी मायलेकीनी मालाड पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.