अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून आत्महत्या असल्याचे एम्स रुग्णालयाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालात म्हटले होते. एम्सच्या या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करून हा अहवाल बाहेर लीक झाल्याने एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.सुशांत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांकडून हे तक्रार पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांनी एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक अहवाल लीक केल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सुशांतच्या मृत्यूबद्दलचा अहवाल सीबीआयकडे सादर केला होता. या अहवालात सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी हत्येची शक्यतेला देखील जागा ठेवली नव्हती. सुशांतच्या कुटुंबाचे वकिल विकास सिंह यांनी एम्सच्या या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवीन फॉरेन्सिक टीम नेमणूक करण्याची मागणी केली होती. आता सुशांतच्या कुटुंबियांनी एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केल्याचे म्हटले जाते आहे. याबाबत डेक्कन क्रोनिकलने माहिती दिली आहे.