बारामती: पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दिनांक 10)मोठ्या कौशल्याने कारवाई करीत भोंदू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले यास सातारा जिल्ह्यातील सालपे गावी जेरबंद केले.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ट पथक नेमण्यात आले होते. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपींचा पथकाने तत्काळ शोध घेण्यास सुरवात केली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर उर्फ मामा भोसलेचा तो वापरत असलेल्या मोबाईलवरुन माग काढण्यात आला. त्यात तो सतत कार्ड बदलत होता. गुरुवारी(दि ९) रात्रीच त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर शुक्रवारी सालपे गावातील फार्महाऊसवर पथकातील पोलीस पोहचले. हे फार्महाऊस एका डोंगरावर निवांत ठिकाणी आहे. पोलीस पोहचले तेव्हा मामा भोसले एका खुर्चीवर निवांत बसला होता, यावेळी तो मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. पोलीस या ठिकाणी त्यांच्या खासगी वाहनातून पोहचले. पोलिसांना पाहताच मनोहर मामाला धक्काच बसला.
पोलिसांनी दाखल गुन्ह्याची माहिती देत कारवाईची माहिती दिली. त्यावर ‘चला येतो’ म्हणत तो पोलिसांबरोबर गाडीत बसुन बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहचला. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभाग प्रमुख नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा पोलिस निरीक्षक संदीप येळे,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार विजय कांचन, अजय घुले, राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांनी ही कारवाई केली.