मुंबई - आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले असून ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे. आज जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यात गाड्या, बसेस ठप्प झाल्या आहेत. अंधेरी येथील डी. एन. नगर परिसरात देखील पाणी साचल्याने प्रवाश्यांची तारांबळ उडाली होती. ऊन, पावसात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या पोलिसांनी आज मुसळधार पावसातही खाकीतली माणुसकी दाखवली आहे.
कमरेपर्यंत पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या आणि अडकलेल्या नागरिकांना पोलिसांनी मदतीचा हात देत त्यांना खांद्यावर उचलून सुरक्षित ठिकाणी पोचवले. तसेच शाळेची बसमधील चिमुकल्या मुलांना देखील पाण्यात उतरू न देता पोलिसांनी लहानग्यांना उचलून घेऊन सुरक्षितस्थळी हलविले. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. मनोज शर्मा आणि झोन ९ चे पोलीस उपायुक्त दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे मदतकार्य केले.