चंद्रपूर - जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल मृत्यूशी झुंज देत असलेल्या गर्भवती मुस्लिम महिलेला रात्री १२ वाजता रुग्णालयात येऊन चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रक्त देऊन तिचे प्राण वाचविले. पोलीस अधीक्षकांसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दाखविलेला हा माणुसकीचा प्रत्यय सर्वसामान्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरला आहे.
शनिवारी रात्री ११ वाजताची वेळ, शबाना सय्यद नामक गर्भवती महिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली. प्रकृती चिंताजनक, शस्त्रक्रियेसाठी अ रक्तगट तत्काळ हवे, असे फर्मान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोडले. एवढ्या रात्री अत्यंत दूर्मिळ अ रक्तगटाचे रक्त आणावे कुठून, असा प्रश्न सय्यद कुटुंबीयांना पडला. त्यांनी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशन या संस्थेशी संपर्क साधला. त्यांच्याकडेही सदर गटाचे रक्त उपलब्ध नसल्याने त्यांनी लगेच रक्त हवे, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ही पोस्ट पाहून तत्काळ संस्थेला भ्रमणध्वनी करून आपला रक्तगट तोच असल्याचे सांगत रक्त देण्याची इच्छा दर्शविली आणि रात्री १२ वाजता रुग्णालयात येऊन रक्तदान करीत माणुसकीचा प्रत्यय दिला. जिल्हा पोलीस अधीक्षकांसारखे अधिकारी जर रक्तदान कार्यात असे चांगला सहभाग नोंदवित असेल तर यापुढे एकही असा रुग्ण आढळणार नाही, ज्याला रक्ताअभावी प्राण गमवावे लागेल.