( ट्रेडिंगचा भुलभुलय्या - भाग ४ )
नागपूर : बोगस ॲपच्या माध्यमातून गुंतवणूकदाराकंडून पैसे उकळल्यानंतर ‘प्रोफेसर गॅंग’कडून काही वेळातच विविध बॅंक खात्यांमध्ये रक्कम वळती करण्यात येते. यातील बहुतांश खाती ही खाजगी बॅंकांमधील असून अगदी राजस्थान ते केरळपर्यंत यांची लिंक आहे. काही खाती तर बनावट स्वयंसेवी संस्थांच्या नावाने उघडण्यात आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या व त्यातून आणखी तिसऱ्या असा पैसे वळते करण्याचा क्रम सुरू राहतो. त्यामुळे अखेरीस पैसे कोणत्या खात्यात गेले हे शोधणे मोठे आव्हान बनून राहते.
‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रवेश मिळविलेल्या ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’ या व्हॉट्सॲप ग्रुपप्रमाणे एकाच वेळी शेकडो ग्रुप्स संचालित करण्यात येतात. त्या सर्व ठिकाणी आलेली रक्कम ठरावीक बॅंक खात्यांमध्ये वळती करण्यात येते. ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून दिवसनिहाय कोणत्या बॅंक खात्यात रक्कम बोलवायची व त्यानंतर ती लगेच कुठे वळती करायची याचा क्रम निश्चित असतो. त्यानुसारच प्रोफेसर गॅंंगकडून इकडून तिकडे आणि तिकडून परत भलतीकडे असा ट्रान्सफरचा खेळ चालतो. या प्रकारामुळे कुणी तक्रार केली तरी पोलिसांना ‘मनी ट्रेल’ काढणे जिकिरीचे जाते. जोपर्यंत अखेरच्या बॅंक खात्याची माहिती समोर येते तोपर्यंत खात्यातील रक्कम काढून टाकण्यात आलेली असते.
काय आहे ‘१० एक्स प्लॅन’ ?ब्लॉक ट्रेडिंगसाठी ग्रुप्समध्ये समाविष्ट झालेल्या गुंतवणूकदारांना पैसे गुंतवायला आकर्षित करण्यासाठी तेथील ‘प्रोफेसर’ किंवा ॲडमिनकडून ‘१० एक्स प्लॅन’ची घोषणा करण्यात येते. ॲपमध्ये त्यादृष्टीनेच सेटिंग करून ठेवलेली असते व ब्लॉक ट्रेडिंगमध्ये स्वस्त शेअर दिल्यावर आठवडा- दोन आठवड्यांत व्हर्चुअल नफा दुप्पट झाल्याचे दिसून येते. सहा महिन्यांत गुंतवणूकदारांजवळचे पैसे १० पट होतील, असा दावा करण्यात येतो. विशेष म्हणजे १० लाख, ५० लाख इतकेच काय तर अगदी पाच कोटी रुपयांपर्यंत गुंतविलेले स्क्रीन शॉट्स ग्रुपमधील काही मेंबर्सकडून टाकण्यात येतात. प्रत्यक्षात ते सदस्य त्या टोळीचेच सदस्य असतात. मात्र, त्यांना मिळणारा नफा पाहून गुंतवणूकदार या ‘प्लॅन’कडे आकर्षित होतात.
अशी समोर येते फसवणूक, मात्र हाती राहतो शून्यया रॅकेटमध्ये अडकलेल्या गुंतवणूकदारांना आपली फसवणूक होत आहे याची कुठलीच कल्पना येत नाही. ४० ते ५० हजारांपर्यंतची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तर प्रोफेसर गॅंग त्याला मंजुरी देते व १२ तासांत ते पैसे गुंतवणूकदाराच्या खात्यावर परतदेखील येतात. यामुळेच विश्वास वाढतो व आणखी नफ्याच्या मोहात जास्त रक्कम गुंतविली जाते. ज्यावेळी एक लाख किंवा त्याहून अधिक रक्कम काढण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ‘रिव्ह्यू’च्या नावाखाली ४८ तास प्रतीक्षा करायला सांगण्यात येते. त्यानंतर जास्त शेअर्स घेण्यात आले असून थकीत रक्कम भरावी लागेल असे सांगत ‘रिव्ह्यू रिजेक्ट’ होतो. जर है पैसे भरले तर पैसे काढताना तथाकथित ‘एमएनसी’ला १० टक्के कमिशन द्यावे लागेल असे म्हणत आणखी रक्कम मागण्यात येते.
कायदेशीर कारवाईची देतात धमकीनफ्यातून पैसे कापा असे गुंतवणूकदाराने सांगितले तर त्यांना कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात येते. दिल्लीतील एका महिलेला तर इन्कम टॅक्सच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर ॲपमधील खाते ब्लॉक करण्यात येते. त्यानंतर गुंतवणूकदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात येते. जर स्क्रीन शॉट्स काढले नसतील तर गुंतवणूकदाराकडे बॅंक स्टेटमेंटशिवाय काहीच पुरावा उरत नाही.
बॅंक खात्यांमागे मोठे रॅकेट?या टोळीच्या सदस्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. अगदी एखाद्या जोड्याच्या दुकानापासून ते भाजी विक्रेत्याच्या नावावर बॅंक खाते उघडण्यात येते. केरळमधील एक बॅंक खाते तर स्वयंसेवी संस्थेच्या नावाचे असल्याची बाब समोर आली. या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये गुंतवणूकदारांकडून आल्यावर ते वळते करण्यात येतात. या टोळीकडून तीन ते चार राष्ट्रीय पातळीवरील खाजगी बॅंकांमध्ये जास्त खाती उघडण्यात आली आहेत. यासाठी प्रसंगी बॅंकेतील कर्मचाऱ्यांसोबतदेखील ‘डीलिंग’ होते की काय, असा सवाल यातून उपस्थित होत आहे.
(पुढील भागात : आयुष्यभराची कमाई झाली स्वाहा-अनेक निवृत्तांना गंडा, बिझनेसवुमनपासून खऱ्या प्रोफेसरपर्यंत शेकडोंचा आर्थिक कपाळमोक्ष)