मुंबई - मुंबईसह राज्यभरातील १९ तरुण-तरुणींना भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टरपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ७ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ठगांनी बनावट प्रमाणपत्रासह रेल्वेचे बनावट संकेतस्थळ तयार करत यावर संबंधित तरुणांची नावे प्रसिद्ध करून त्यांचा विश्वास संपादन केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेचे कक्ष ११ अधिक तपास करत आहेत.ऐरोली येथील रहिवासी असलेले सखाराम लांडगे (३७) यांच्या तक्रारीवरून या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लांडगे यांच्या तक्रारीनुसार, २०१६ पासून वाराणसी, कोलकाता या ठिकाणी लांडगे यांच्यासह १८ उमेदवारांना तसेच बाहेरील राज्यांतील मुलांनाही राजेशकुमार, मनिष सिंग, संजीव रॉय व सीमा पवार तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी भारतीय रेल्वेत टिकीट कलेक्टर या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून ७ लाख रुपये उकळले. आरटीजीएसमार्फत हे पैसे त्यानेस्वीकारले.या तरुणांना भारतीय रेल्वेचा लोगो असलेली बनावट अपॉइंटमेंट पत्र, बनावट पोस्टिंग लेटर, बनावट पेमेंट स्लिप, बनावट आयडी कार्ड देऊन, तसेच भारतीय रेल्वेच्या तयार केलेल्या बनावट संकेतस्थळावरून तक्रारदार व इतरांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे या तरुणांचा आरोपींवर विश्वास बसला. नोकरीची स्वप्ने रंगविण्यास सुरुवात केली असताना आरोपी नॉट रिचेबल झाले. त्यांनी दिलेली कागदपत्रेही खोटी निघाली. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अधिक तपास सुरू आहे.मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यताराज्यभरात शेकडो तरुणांची फसवणूक झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, आरोपी जाळ्यात आल्यानंतर मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून १९ तरुणांना गंडा, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 3:07 AM